Friday, June 7, 2019

अनोळखी चाहूल ( भयकथा)



'अनोळखी चाहुल'

by sanjay kamble
'
  "कुठवर  ** असे *** करून *** पोट भरू...?"
भरड्या आवाजातील हे तुटक, अर्धवट शब्द कानावर पडताना  सोबतच माझ्या उषाशेजारी कोणीतरी बसलय असच दिसु लागल. रात्रीच्या अंधारात काळ्याभोर केसांनी झाकलेला तो चेहरा , त्यातुन दिसणारा डाव्याबाजुचा रक्ताळलेला डोळा माझ्यावर रोखलेला. दंडातुन तुटलेला डावा हात माझ्या छातीवर रूतवला आणी उजव्या हातातील लांब धारधार सुरा गळ्यावर ठेवला आणी खस्स कन.......
'आई.... ' तोंडातुन नकळत शब्द फुटले आणी
झटकन जागा झालो ..बाप रे काय भयानक स्वप्न होत... भीतीन अजुही काळीज धडधडतय.. कुस बदलली पन डोळ्यात बोटे घालावी असा मिट्ट अंधार पसरलाय.
काहीच दिसत नाही आहे.. कदाचीत घरातली आणी बाहेर डांबावरील लाईटही गेली आहे. काळ्या कुट्ट अंधारात खिडकीतुन दिसणार पांढरट एकसारख आभाळ आणी कोसळणारा पाऊस यांचा आवाज परिस्थीती अधिकच भयाण करतेय. आणी या एकांतात जशी चाहुल जाणवतेय... जणु एकांतातही एकट नसल्याची चाहुल...
या निरव भयाण शांततेत बाहेरच्या लख्ख काळोखात धो धो कोसळणा-या पावसाचा सरसरणार आवाज मात्र आहे, तसा हा आवाज आपल्या सर्वांच्याच परिचयाचा, जर तुम्ही आहात तीथे पाऊस चालु असेल तर पावसाचा हा आवाज तुम्हीही ऐकु शकत असाल... बाहेर दारात , कौलारू घरांच्या छपरांवर, सिमेंट वा लोखंडी पत्र्याच्या छतावर पावसाचे तडतड आवाज करत कोसळणारे ते थेंब मी ही आता ऐकतोय, पन मध्यरात्रीची वेळ, पसरलेला अंधार आणी एकांत यात अशा या भिषण वातावरणाची भीती नाही वाटली तर नवलच.. त्यात एक अनोळखी  चाहुल जाणवतेय ... जस कोणीतरी माझ्या बेड जवळ बसलय .. आता बेडजवळ की खाली हे समजत नाही आहे पन चाहुल स्पष्ट जाणवतेय...
 आज तसा प्रवासान खुप थकवा आलाय.. डोळे काही केल्या उघडत नाहीत. एका कुशीवरुन दुस-या कुशीवर झालो आणी काहीतरी जाणवल ... कोणीतरी माझ्या बेडवर बसल होत पन मी कुस बदलताच ते बेडवरुन उठल...... हो , अगदी तशीच हलचाल जाणवली होती.... पन कोण असेल.....? घरी तर कोणीच नाही...  मग कोण आहे या एकांतात..?




माझे कान लहानात लहान आवाजाचा वेध घेऊ लागलेत. तो आवाज मात्र येतच आहे.... एका रुम मधुन दुस-या रुम मधे चालत जाण्याचा आवाज.. कधी धावत गेल्याचा आवाज.. कधी खुप दुर तर कधी एकदम जवळ... आपण घरात एकट आहोत हे माहीत असुन जेव्हा अशी अनोळखी चाहुल जाणवु लागते तेव्हा खरच काळजातुन भय दाटुन येत..
पन ते काय आहे हे पहायच धाडस मात्र खरच माझ्यात नाही आहे... या अंधा-या खोलीत बाजुच्या खिडकीतुन येणा-या प्रकाशात डोळे किलकीले करत घड्याळावर नजर टाकली .
बाप रे.. रात्रीचे 2 वाजलेत... आजचा सलग तीसरा दिवस बरोबर दोन ला जाग येतेय... काय कारण असाव...?
या एवढ्या मोठ्या घरात मी एकटाच आहे आणी जाग आलीये.. ती ही रात्री दोन वाजता. त्यात कहर म्हणजे बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस आणी लख्ख काळोख जसा मला गिळंकृत करेल असच वाटतय..
आणखी एक विसरलोच..... ती चाहुल..?
हो.... ती अनोळखी चाहुल...
         मी  रहातो तीथ तशी लोकवस्ती कमीच आहे, म्हणजे आजुबाजुला किंचीत घर आणी रिकाम्या जागेवर काटेरी बाभळींचा घुसपा आणी पळसाची कुठतरी खुरटी तर कुठ कंबरेपर्यान्त वाढलेली झाड... गुडघ्यापर्यंन्त गवत...   रस्ता तसा कच्चाच आहे आणी रस्त्यावरील खांबांवर पांढ-या ट्युब्स.. पन त्या ही आज बंद आहेत... पन कुठुनतरी येणा-या प्रकाशात अंधुकस का असेना, पन दिसतय... भिंतीवरील घड्याळाच्या सेकंदकाट्याचा टीक , टीक,  टीक असा मंद आवाज एवढच सांगतोय की वेळ पुढ सरकतेय... आणी पुढे सरकणा-या या सेकंदाबरोबर काळजातल भय अाणखीनच दाट होत चाललय. घसाही कोरडा पडलाय पन उठुन पाणी प्याव एवढ धाडस होईनास झालय...
कधी कधी चारचौघात आपन खुपच धाडशी असल्याच आव आणतो पन भीतीची जाणीव होते ती अशा रात्री... खरतर भीती म्हणजे काय.... ? आता ते अवलंबुन आहे की आपण कुठे आहोत....आजुबाजूला काय परिस्थिती आहे... आणि त्या परिस्थितीचा आपल्यावर काय परिणाम होत आहे...किंवा होईल.. म्हणजे आपण एखाद्या नवख्या चालकासोबत प्रवास करतोय आणि तो मात्र आपल्या गाडी च्या आडवी येणारी वाहाने चुकवत गाडीचा वेग ५० वरुन ताशी ९० किमी च्या पुढे नेत राहील.. एक दोन दा तो गाडी ट्रक खाली नेता नेता चुकेल तेव्हा वाटणारी भीतीच. म्हणजे परिस्थिती प्रमाणे भीतीची तिव्रता...
आज माझी ही परिस्थिती तशीच आहे...त्याला कारणही तसच आहे... हो कारण.. एक घटनासत्र.. एक भयाण भिषण , कदाचीत हे शब्दही कमी पडतील असच काहीस... हो असच काहीस...




  आमच्या गल्लीत रहाणारी एक मुलगी काही दिवसांपासुन पित्ताच्या त्रासान हैरान होती, त्या ही रात्री अचानक गुळणी आली तशी समोरचाच दरवाजा उघडुन बाहेर गेली.. थोडा वेळ तशीत बाहेर होती तीची आई अंथरुणात पडुनच तीला जास्त उलट्या करू नको म्हणुन समजावत होती, मागील आठ दहा दिवसापासुन तीचा हा त्रास सुरूच होता , कधी दिवसा कधी रात्री उलट्यांचा त्रास. त्यामुळ अती जागरणान आईचीही तब्बेत बरी नव्हती. त्या दिवशी नेमक्या त्या बाहेर गेल्या नाहीत तर तशाच पडुन बाहेर जाण्यासाठी तीच्या भावाला उठवत होती..
पित्ताच्या उलट्या करत ती मुलगी बाहेर बसलेली. बराच वेळ ती आत आली नाही.. तीला साद देत आई बाहेर आली तर ती मुलगी दारात बेशुद्ध दिसली. घाईघाईत नव-याला मुलांना उठवल आणी तीला उचलुन आत आणल...
    सकाळ पर्यंन्त तीला जाग नव्हती... दुपारची केव्हा उठलीआणी अंथरूणात ऊभी राहीला पन कोणाशी काहीच बोलत नव्हती अगदी शांत होती पन तीची नजर मात्र एके ठिकाणी स्थिरावलोली, आई किचन मधे आपल्या कामात होती, तसा बाहेरून पाणी ओतत असल्याचा आवाज येऊ लागला, पन त्यांना दुर्लक्ष केल, तोच शेजारची एक बाई ओरडली...
" ए कवीचे आई, बाहेर ये लवकर.. हे बघ काय विपरीत..."
तस हातातल काम टाकुनच घाईघाईत त्या  बाहेर आल्या . आणी पाहुन शहारल्या, कवीता दारात उभी होती आणी बाजुला भरलेल्या बॅरल मधे हातातली रिकामा घागर बुडवली, क्षणात पाण्याने भरलेली ती घागर झटकन बाहेर काढली आणी तशीच उभ्याने अंगावर ओतुन घेऊ लागलेली..... एक , दोन,  तीन बघता बघता दहा एक घागरी तीन अंगावर ओतुन घेतल्या... तशी आई  आोरडली.
" ये कविता.. अग डोचक फिरल काय तुझ.. अस काय करतीयास..?"
पुढ येत हातातली घागर हिसकावुन घेताच कवीतान झटक्यासरशी मान फिरवत रक्ताळलेल्या नजरेन त्यांच्याकड पाहील, तीचे डोळे आणी चेह-यावरचे विचित्र हावभाव पाहुन आईच्या काळजात धस्स झाल, पन इतक्यात
  काहीच न बोलता ती मुलगी पुन्हा बेशुद्ध झाली.. शेजारच्या दोघी तीघी महिलांनी तीला उचलुन आत नेल. अंगावरचे कपडे बदलुन तीला बेडवर झोपवली... रात्री ती जेवायला पन उठली नाही...
            त्या रात्री घरचे सारे झोपले होते. दोन वाजले असतील..  तीची आई ठसक्याने जागी झाली तर घरभर धुर आणी तो दर्प.. आईने दरवाजा उघडला तर बाहेर कसलाच धुुर नव्हता...पन घरभर मांस करपलेला दर्प पसरलेला, दरवाजा तसात उघडा ठेऊन त्या स्वयंपाक घराच्या दिशेने पाहु लागल्या पन काळोखान सार काही माखल होत. लाईटच बटन दाबल पन लाईटही नव्हती, उशाला नेहमी मेणबत्ती आणी माचीस असायची , अंधारात चाचपडत मेणबत्ती पेटवली आणी किचनमधे निघाल्या. मेणबत्तीच्या तांबुस पिवळसर प्रकाशात किंचीत धुसर दिसु लागल, धुरान डोळ्यांची जळजळ होऊ लागलेली, पन तशाच चालत त्या धुरकटलेल्या किचन खोलीत पोहचल्या. आत एक पांढरी पाठमोरी आकृती तेवढीच दिसत होती. मेणबत्ती समोर धरत त्या पुढ निघाल्या आणी त्यांनी साद दिली...
" कवीता...बाळा किचनमधे काय करतेयस..?"
गैस सुरु होता आणी कवीता त्यावर काही भाजत होती... पुर्ण बाह्यांचा पांढरा गाऊन त्यावर मोकळे सोडलेले केस . आणी श्वासातली घरघर यांनी आई थोडी घाबरलीच होती..  किचनकट्या समोरील उघड्या खिडकीतुन स्ट्रेटलाईटचा येणारा प्रकाश तेवढाच आत पसरलेला.
आई आणखी पुढ जात पाहु लागली तस अंगावर शहारा आला,  डोळे विस्फारुन पहातच राहीली.. मेणबत्तीच्या पिवळसर प्रकाशात पुर्ण किचनकट्ट्यावर पसरलेला रक्ताचा सडा पाहुन त्यांची बोबडीच वळली... गर्भगळीत होऊन त्या मुलीकड पाहु लागल्या . तीन गैस फुल्ल केलेला आणी हातातील मांसाचा तुकडा गैसवर भाजत त्यावरील मांस तसाचे गरम खात पुन्हा भाजत होती.  पायात ओलसर चिकटस काही होते म्हणुन मेणबत्ती खाली करत पाहील आणी जोरात किंचाळल्या... पायात काळ्या तांबुस पंखांचा खच आणी रक्ताने माखलेले काळ्या कोंबडीचे पोटातील अवयव विखुरले होते... पांढ-या फर्शीवर हे अधिकच भडक भयान दिसत होत.. आईच्या आवाजान भावाला जाग आली , तो धावतच आत आला आणी जमिनीवर थरथर कापत बसलेल्या सावरू लागला, समोर बहीनीच ते रुप पाहुन तो ही घाबरला, इतक्यात एक भरडा आवाज कानावर आला...
" तुम्हाला पन भुक लागलीये.. हे घ्या. खा..."




आई आणी भाऊ दोघे कविताकड पाहु लागले, तसा कवितान हातात असलेला मांसाचा तुकडा पुटपूटत  खिडकीतुन बाहेर दिला... भावान मान वर करून पाहील तर खिडकीत कोणीच नव्हत पन आई मागे पाहुन  किंचाळण्याचा प्रयत्न करू लागली, पन आवाज फुटत नव्हता.. त्यांनी आपल्या मुलाला भिंतीकड हात करत पहाण्यास खुणावल तस भावान मागे भिंतीकड पाहील आणी भितीन थरथर कापु लागला... खिडकीतुन येणारा प्रकाश मागे भिंतीवर पडलेला त्यात कविताची आकृति दिसत होती आणी खिडकी बाहेरही ब-याच  आकृत्या हात पसरलेल्या दिसत होत्या.. सार मांस तुकडे करून तीन खिडकीतुन बाहेर दील आणी  पुन्हा चालत हॉलमधे निघाली... एकदम शांत, निवांन्त चालत ती आपल्या अंथरुणात जाऊन झोपली आणी आई मात्र भितीन थरथरत रडु लागली..
               ****
सकाळ झालेली, कविता अजुन झोपेतच होती, तोच शेजारी रहाणारी एक महीला जोरजोरात अर्वाच्च शिविगाळ करत असल्याच कानावर आल. आई बाहेर आली आणी काय झाल विचारू लागली तशी ती महिला सांगु लागली.
" आहो रात्री कुणाच्या बोक्या न आमची कोंबडी पळवली... कशाला बोक, मांजर पाळत्यात रां*...."
कविताची आई काहीच न बोलता घरात परत आलीा, नवरा रात्रपाळी करून नुकताच आलेला , रात्री घडलेला प्रकार सांगावा तर ते आधीच दमुन आलेत.
किचन मधे जाऊन नव-या साठी चहा करत होत्या , मुलगा अजुन बाहेर हॉलमधे झोपलेला तर मुलगी....?
ती आपल्या अंथरूणात नव्हती...
"कविता...?"
घाबरतच त्यांनी हाक दिली तसे वडील समोर ठेवलेल वर्तमानपत्र उचलत  म्हणाले ,
"आताच बाथरुम मधे गेलीये. अंघोळीला..."
आई थोडी आश्चर्यान पहात बाथरुम कडे गेली तर कविता बाथरूम मधे उभी होती.  जवळच गरम पाण्याने भरलेली बादली होती.
अंगावरचा गाऊन पुर्ण भिजलेला तर केस मोकळे सोडलेले जे चेह-यावर पसरलेले.
कोप-यात एके ठिकानी तीची नजर खिळलेली. रक्ताळलेली नजर आणी चेह-यावरचे रागिट भाव पाहुन आई म्हणाली.
" कविता.... अशी का उभी आहेस ..? कविता..?"
आईच्या या प्रश्नाने ती झटकन मागे फिरली आणी एका घोग-या आवाजात बोलु लागली...
" आज रातीला पन मांस हव आहेे...? आणी गरम रक्त ही हव आहे..? "
तीची आई भितीन थरथर कापत होती,
"अहो.... इकड या.. बघी पोरीला काय झालय..?"
आपल्या पत्नीचा जड आवाज ऐकताच त्यांनी हातातल वर्तमानपत्र खाली ठेवल आणी आत आले.
" काय झाल ग.?" पत्नीकड पहात विचारल आणी त्यांची नजर बाथरुमच्या उघड्या दरवाजातुन आत गेली..
" कवीता... काय झाल.. बर वाटत नाही का..?
त्यांचीही वाचा जड होत चाललेली... कवीता तशीच कोप-यात उभी होती. आवाजातील घरघर आणी रक्ताळलेली भिषण नजर आता चोहीकडे फिरु लागलेला. आई तशीच रडवेल्या चेह-याने काविता जवळ जात होत्या की कविता झटकन खाली झुकली... गरम पाण्याची बादली उचलुन डोक्यावर सर्रर्रर्रर्रर्रर्र कन रिकामी केला.. आई डोळे विस्फारून थरथरत जागेवरच थांबली , तोच कवितान आपल्या हातच्या मुठी करकचुन आवळ्या आणी सर्वताकतीनीशी किंचाळली. त्या आवाजान आई मटकन खालीच बसली तोच
कवीता जागेवरच बेशुद्ध झाली .....


                  *****


ती बेडवर शांत झोपली होती. बाजुला वडील बसलेले तर डोक्याजवळ आई बसुन तीच्या केसातुन , डोक्यातुन हात फिरवत रडत होती..
" काय झालय हे माझ्या पोरीला... काही समजनास झालय...?"
डॉक्टरांनी तीच्या हाताची नाडी पाहीली , तापमापी न अंगातील ताप पाहीला आणी एक इंजक्शन देत वडीलांच्या हाती एक चिठ्ठी दिली ज्यात काही औषधी लिहिलेली..
" साहेब नेमक काय झालय..?" ते काळजीन विचारू लागले.
" टेस्ट कराव्या लागतील. मानसिक आजाराची लक्षण दिसत आहेत..."
डॉक्टर निघुन गेले पन सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचूकली...
" आहो त्या रात्री पोरगी उलट्या करत होती आणी बेशुद्ध झालेली. तेव्हा पासुन सरु झालय हे... आजार नाही. बाहेरच वारं दिसत .." आई काळजीन बोलु लागली.
वडील शांतपने ऐकत होते . त्यांनी एक नजर आपल्या मुलीकड पाहील आणी झटकन बाहेर पडले. आजुबाजूच्या काही महीला दारातुनच पहात आपसात कुजबूज करू लागल्या... ती हळुहळू जागी होऊ लागली. रक्ताळलेल्या डोळ्यांनी तीन आईकड पाहील... आणी भरड्या आवाजात बोलु लागली...
" भुक लागलीये मला.."
बरळतच उठण्याचा प्रयत्न करत होती तोच  संतापली, चवताळली , रागाने जशी वेडी झाली...


" ए बये ...."
आपल्या आईकड पहात एवढे मोजके शब्द तीच्या तोंडातुन बाहेर पडले आणी ती भयानक नजरेन स्वता:च्या देहाला पाहु लागली...  हात हालवता येत नव्हते आणी पायही. सार शरिर जखडुन ठेवलेले. गच्च दोरीने बांधुन ठेवलेल.
" सोड मला... ए बये तुला माहीत नाही तु कुणाला बांधुन ठेवलयस. एवढ सोप्प हाय का...?सोड मला"
आई थरथरत्या नजरेन तीला पहात होती. बाहेर उभ्या महीला आणी पुरूष यांपैकी कोणीचीच आत जायची हिम्मत होईना. आम्ही सर्व तीचा भरडा, किळसवाणा आणी काळजाचा थरकाप उडवणारा आवाज बाहेरून ऐकत होतो तोच कोणीतीरी वयस्कर व्यक्ति आमच्यावर खेकसल..
" ये पोरांनो... चला आपापल्या घरी.."
तसे सर्वच तीथुन निघुन जाऊ लागले..

       *****


त्याच दिवशी संध्याकाळी तीचे बाबा एका मांत्रीकाला घेऊन आले... त्याला पाहुन वाटल की कोणीतरी सभ्य माणुस असावा. एकदम साधा पेहरावा. मोरपंखी पैंट वर पांढरा किंचीत चुरघळलेला शर्ट हातात साधीच कापडी पिशवी, विरळ होत चाललेले पांढरे केस आणी पायात साध्या चपला जशा कोणा शिक्षाकांच्या पायात असतात.
उत्सुकते पोटी आम्ही खिडकीत उभे आत पहात होतो.  तीेच्या वडीलांनी त्या खोलीतील साहीत्य रिकाम केल आणी तीला धरुन आत आणल, जसा तीच्या अंगात त्राण राहीलाच नव्हता, तीच्या दंडाला धरुनच त्यांनी खोलीच्या मधे बसवल. दोन दिवसांनी मी तीला पहात होतो. मध्यम बांधा, नितळ गोरा रंग, गुडघ्यापर्यांत आलेले मोकळे केस ही तीची ठेवण आता पुर्णच वेगळी दिसत होती. पांढरीधोट त्वचा हाडांना चिकटली होती तर डोळे थकलेल्या वयस्कर जीर्ण माणसासारखे खोबनीत गेले होते. तीची अवस्था पाहुन अंगावर जसा काटाच आला.. आणी मन खरच हळहळल..  तो इसम चालत गेला आणी  बाजुच्या टेबलवर ठेवलेल्या कापडी पिशवीत हात घालुन एक पुडी बाहेर काढुन त्यात असणारी पांढरट भुकटी जशी राखच. हातात घेत त्या मुलीभोवती गोल रिंगण आखल, त्या रिंगणाला छेदतील अशा पाच रेघा आखल्या आणी जिथे रेखा एकमेकींना स्पर्श करत होत्या त्यांवर लिंबु ठेवले, त्या लिंबांना  हळद कुंकू चढवला. तीथ उपस्थीतांना म्हणजे आई वडील भाऊ आणी आमच्या शेजारचे ते गृहस्त ( जे आमच्यावर खेकसले होते ) सर्वांच्या कपाळावर विभुती लावला प्रत्येकाच्या जवळ एक पुरचुंडी दीली..
आणी एक वेताची काठी बाहेर काढत जोरात जमिनीवर आपटली तशी ती किंचीत हलचाल करू लागली... पालथी मांडी घालुन ती बसलेली, हात पुढ ठेउन मान खाली घातलेली आणी एकसारखी कण्हत होती. चेहरा केसांनी पुर्ण झाकलेला ते केस जमिनिवर पसरलेले..
" सोड तीला सैताना..."
जोराने त्या मांत्रीकाने हातातील काठी तीच्या पाठीवर मारली तसा राप्प कन आवाज घुमला आणी ती संतापली. झटकन वर पहात ती जोराने किंचाळली. पन तो आवाज तीचा नव्हता. घोगरा पुरषी आवाज त्या खोलीत काही वेळ अक्षरशा: घुमत राहीला, तीच्या आईने कानावर हात ठेवले आणी तोंड फिरवुन रडु लागल्या... त्या भिषण आवाजान खिडकीवर आम्ही ठेवलेले हात झटकन सोडले आणी दोन पावल मागे सरकलो...  आमच्या पैकी काही जण त्या आवाजाने तीथुन निघुन गेले पन मी आणी दोघे मित्र तसेच उभे आतिल त्या विचित्र गोष्टी कुतुहलाने पाहात होतो. आता पावसाला सुरवात झालेली.. खिडकीला पुर्ण चिकटुन आम्ही उभे आतील दृष्य पहात होतो. त्या मांत्रीकाने पुन्हा पिशवीत हात घातला आणी पांढरी भुकटी बाहेर काढत तीच्या तोंडात सारायचा प्रयत्न करू लागला तशी ती लाल रक्ताळलेल्या डोळ्यानी त्यांच्याकड पहात झटकन उभी राहिली तोच त्याने हातातील ती भुकटी तीच्या अंगावर फेकली . अर्धवट झाकलेल्या चेह-यान तीन आम्ही उभ्या खिडकीकड पाहात तीने जोराची आरोळी ठोकली आणी रखरखत्या नजरेन पहातच राहीली. तीचा तो भयान चेहरा पाहुन तीथ थांबण्याच धाडस होईना. पन मन जायच नाव घेईना.. तोच तो मांत्रीक दरवाजाच्या आडव्या उभ्या लोकांना म्हणाला.
" दरवाजा तुन बाजुला व्हा...ही अदृष्य शक्ति जाता जाता दुस-या कुणाच्या तरी अंगात शिरेल.. पुन्हा त्यान जोराची काठी पाठीत हाणली तशी ती किंचाळली आणी बेशुद्ध होऊन त्याच रिंगणात पडली.


          *****

तीला तिाच्या रूम मधे झोपवुन सर्व बाहेर बसले तसा मांत्रिक सांगु लागला.
"तुम्हाला भुतांच्या पालखी बद्दल काही माहीत आहे का....? असेल वा नसेलही, पन ज्यांना आहे त्यांना समजल असेल आणी ज्यांना नाही त्यांना थोड समजावतो.."

त्यांच्याकड शांतपने पहात सर्वजन ऐकु लागलो तसे ते पुढ म्हणाले..

"अमावस्येच्या रात्री आपल्या परिसरात असणा-या असामान्य नैसर्गिक शक्ती एकत्र येतात त्यांच्या समुहातील मुख्य वेताळ एका ठरलेल्या वाटेवरून नेतात त्याला भुतांची पालखी म्हणतात... आठ एक दिवसापुर्वी रात्री तीला पित्ताचा जास्तच त्रास होत होता.. एका कुशीवरून दुस-या कुशीवर ती तळमळत होती..जळजळ होत पित्ताच आंबट पाणी गळ्याशी आल तशी ती अंथरूणातुन उठली आणी बाहेर आली... आपल्या घरातुन बाहेर वाटेवर येत ती उलट्या करत तीथेच थकुन बसली ..
इतक्यात तीला काही जाणवल..
दुरवर पसरलेल्या काळोखातुन काही अस्पष्टशा आकृत्या पुढ सरकत असल्यासारख्या दिसु लागल्या... त्यांच्याकड पहात ती घराच्या पाय-या चढुन वर जातच होती की कोणीतरी साद घातली तशी ती जागेवरच थांबली..."

"कोणी साद घातली..?" वडील विचारू लागले..

तसे मांत्रीक म्हणाले
" बाहेरच वारं होत ते.. वा-याची एक लहर तीच्या अंगाला स्पर्श  करून गेली तशी ती शहारली आणी मागे फिरली..  काजळलेल्या त्या वाटेवर काही पांढ-या आकृत्या रस्त्याच्या पलीकडे असणा-या त्या बाभळीच्या झाडांच्या दुस-या बाजुला एका ठिकाणीहुन पुढ पुढ सरकत होत्या, तीला हे जरा विचित्र वाटल.  जशा कोणत्याही संगिता वीना त्या नृत्य करत होत्या.. नाचत होत्या... विचित्र हावभाव करत होत्या.... नृत्य... त्यांच तांडवनृत्य सुरु होत. ती मुलगी डोळे विस्फारुन ते दृष्य पहात होती.. पुढ सरकतील तस हळुहळू त्या आकृत्यांच तांडवनृत्य उग्र होत चालल आणी त्यांचा आकारही स्पष्ट होत पुर्ण होऊ लागला...  समोर हाकेच्या अंतरावर सुरु असलेला हा प्रकार ती धडधडत्या काळजान पहात होती तोच त्या आकृत्यांमधली एक आकृती नृत्य करता करता थांबली.. त्या मुलीची नजरही त्या शांत उभ्या पन लक्ष कुठेतरी दुर असलेल्या आकृतीवर खिळली..

 क्षणभर सार काही स्तब्धच झालेल की झटकन त्या आकृतीन  मुलीकड पाहील तशी ती शहारली , पांढरट धुरकट ती आकृती आपल्या रिकाम्या डोळ्याच्या खोबण्यांनी तीला पहात आपला जबडा पसरु लागली,  वीतभर पसरलेला तो जबडा पहात ती भितीन थरारली आणी... तशा सा-याच आकृत्या त्या दिशेन पहात आपला भयान जबडा पसरुन भयान आवाज करत ओरडु लागल्या आणी हे दृष्य पाहुन तीची शुद्ध हरपली...."
जोपर्यंन्त तो बोलत होता तोवर कुणीच त्याला प्रश्न विचारला नाही... सर्वजण कुतुहलाने सार ऐकत होतो तसे  ते पुढ म्हणाले.
" ती अजुन पुर्ण मुक्त झालेली नाही. ते तीला संपवायला आलेत. कारण त्यांच्या पालखीला पहाणारा जिवंत रहात नाही अथवा जिवंत ठेवायचाच नाही असा त्यांचा नियम असतो... आपण प्रयत्न करूया बाकी ' तोच कर्ता धर्ता.'"
ते जात होते तोच पुन्हा म्हणाले...
" त्या पिशाच्चांना आपण डिवचल आहे. ते आता खवळलेत. उद्यापासुन पुन्हा हेच विधी करावे लागतील. जोवर ती मुक्त होत नाही तोवर... ' ही पिशाच्च रात्री कोणाच्याही रुपात , कोणाच्याही आवाजात दारावर हाक देतील.. पन दरवाजा उघडु नका..'
काळजी घ्या.."
ते निघुन गेले तसे आजुबाजुला जमलेले लोकही  आपापल्या घरी परतु लागले... आम्ही मुल कट्यावर बसलो, या विषयावर ब-याच उशीरपर्यंन्त चर्चा रंगली.. पन नेहमी बारा एक पर्यांन्त बसणारी आमची मैफिल तेव्हा मात्र आकरा च्या आतच आटोपली...

             *****
    
त्या रात्री कविताला कोणताच त्रास झाला नाही पन काल रात्री जे घडल त्यान सारेच हादरून गेलेत... कदाचीत म्हणुनच मला घरच्यांनी इकड येण्यापासुन रोखल असाव...
आज सकाळी आम्ही सर्व म्हणजे आई ,बाबा आणी मी गावी आलो होतो... वर्तमान पत्रातील त्या बातमीन सर्वच हादरून गेलेलो.. काल सायंकाळी त्या मांत्रिकाचा अपघात झाला होता. विधी करण्यासाठी येत होता.. कदाचीत ही त्याला चेतावणी असावी, की दुर रहा म्हणुन....
मी मित्रांना फोन करून परिस्थीतीची विचारपुर करू लागलो तसा मित्र सांगु लागला..
"काल रात्री तीची आई ठसक्याने जागी झाली तर कविता बेडवर नव्हती. त्या बाहेर च्या खोलीत आल्या तर दरवाजा सताड मोकळ होता,  आणी करपट वासाने जिव गुद्मरत होता, त्यांनी आपल्या मुलाला जाग केल तसा किचन मधुन कसलासा आवाज येत असल्याच जाणवल. अंधार होताच पन खिडकीतुन येणारा प्रकाश पुरेसा होता... त्या तशाच चालत किचनमधे जाऊ लागल्या तर ओट्याजवळ कविता पाठमोरी उभी होती. अंगात गाऊन घतलेला तर केस मोकळेच सोडलेले.. गैस शेगडीवर ती पुन्हा मांस भाजत असल्याचा धुर घरभर पसरलेला आणी मांस भाजत
ती घोग-या आवाजात काहीतरी बरळत होती.. जशी ब-याच लोकांची कुजबूज आत सुरु होती. आई मागे येत असल्याची चाहुल लागताच तीनं हात वर करत आईला तीथच थांबण्याचा आदेश दिला. तिच्या हातातील रक्ताळलेल्या चाकुवरून रक्त अजुन ओघळत होत...  आईच्या काळजात धस्स झाल.  डोळ्यात खळ्ळकन पाणी तराळल. पुढ जायच धाडस होईना पन जीव ही राहात नव्हता... त्या चालत तशाच आत येऊ लागल्या,  जमिनीवर पाहील तर पंख....?
त्या धडधडत्या काळजान चालत पुढ येऊ लागल्या आणी समोरच दृष्य पाहुन त्यांची दातखिळीच बसली.. तोल मागे गेला आणी त्या भांड्यांच्या कपाटावर आदळल्या तशा खंन्न्न खंन्न्न आवाज करत काही ताट वाट्या जमिनीवर पडल्या. त्या जागेवरच बेशुद्ध झाल्या. त्या आवाजान भाऊ खडबडून जागा झाला आणी धावतच किचनमधे आला.  पन समोरच दृष्य पाहुन तो ही जागेवरच कोसळला... समोरच ते भिषण दृष्य पाहुत त्याची वाचा गेली. डोळे विस्फारुन जमिनीवर पडुनच तो पहात होता तसा एक घोगरा भिषण आवाज कविताच्या तोंडातुन बाहेर पडला..
"आज कोंबडी नाही...."
आणी क्षणभर एक जिवघेणी शांतता पसरली..



"कुठवर  स्वताच अस मांस खायला घालु... आज नव शरिर बघतो..."
आणी तीन स्वताचा डावा हात धारधार चाकुने चराचरा कापुन वेगळा केला तशा रक्ताच्या धारा    कापलेल्या शिरांमधुन उसळुत चौफेर उडु लागल्या. पन तीला त्याची कसलीच संवेदना नव्हती. जणु हे शरिरच तीच नव्हत... त्या तुटलेल्या हाताला उजव्या हातात घेऊन तीन खिडकीतुन बाहेर दीला.....
सकाळी तीचे वडिल घरी आले तर मुलगा आणी आई दोघे किचनमधे बेशुद्ध होते पन मुलगी कुठच दिसत नव्हती. किचन कट्ट्यावर आणी खाली फर्शीवर रक्ताचा सडा पसरलेला.. त्यांनी आरडाओरडा केला तसे लोक जमा झाले. दोघांना हॉस्पिटल मधे दाखल केल आई काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती . भाऊ सुन्न झालेला..."
मित्राच फोनवरच ते बोलण ऐकुन सुन्न झालो..

          *******

         आई बाबा मी कार्यक्रमासाठी मामाच्या गावी आलो होतो.. मामाच्या मुलीला पहायला.. लग्नासाठी .. आईन अक्षरशा:... जाऊदे.... मला उद्या ड्युटीवर जायच आहे .  त्यामुळे मी एकटाच इकडे म्हणजे गावाहुन घरी आलोय... त्यात गल्लीत घडत असलेला हा प्रकार... आई म्हणत होती जाऊ नको, पन तीथ चार चौघात मी भीत्रा ठरलो असतो... मी किती धाडशी आहे हे दाखवण्यासाठी आई ला म्हणालो...
"आज जग कुठ पोहोचल आहे... आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहावरची मोहिम यशस्वी पने पार पाडली आणि तुम्ही भुत पिशाच्च शकुन अपशकुन यातच गुरफटुन आहात..."
माझ्या बोलण्यान तीथल्या लोकांना मी खप धाडशी वाटलो पन आता समजल की जगातच्या पाठीवर सर्वात भीत्रा कोण असेल तर तो मी आहे. तशी आई पुढ येत म्हणाली.
" माहीत आहे.. खुप धाडशी बाळ ते... पन गल्लीत काय चालु आहे माहीत आहे ना..."
"हो ग आई.."
" मग.. बर ते जाऊदे , हे तुझ घड्याळ घे.... अंघोळ करताना तिथच विसरला होतास... आणी नीट जा..."
" अरे हो...  मघाशी तसच बाथरूम मधे राहील होत..आणी हे घड्याळ मघापासुन शोधतोय."


घड्याळ हातात घालतच बाईकवर बसलो..
वा-यासोबत गुज करणा-या माझ्या बाईकने 70 ते 75 किमी अंतर  तासाभरात तोडले..
मघाशी गावाकडुन येतायेता कविताच्या आईला आणी भावाला हास्पिटल मधे पहायला गेलेलो. जबर मानसिक धक्का बसलेला दोघांनाही. वडील डोक धरुन सुन्न पने बसुन होते. एक हसत खेळत घर उध्वस्त झालेल.  पन कविता...? कविता अजुनही सापडली नव्हती... ती रात्री कुठ गेली..? तीचा काय झाल..? कसलीच कल्पना कोणालाच नव्हती...

                  *****

       आता रात्रीचे आडीज वाजत आलेत, न रहावुन मला वाटतय की घरी कोणी तरी आहे... माझ्या  व्यतिरिक्त...पन खरच आहे की मला भास होतोय...? कदाचीत आठ दिवसापासुन गल्लित सुरु असलेला हा थरारक प्रकार डोक्यात गेलाय त्यामुळेच असे भास होत असतील... मिट्ट काळोख आता काहीसा धुसर होतोय त्यासोबतच एक आवाज येतोय, एखाद शरिर फरफटत येण्याचा किंवा नेण्याचा.
हो तसच काहीस. आवाज किचन च्या दिशेने जातोय...मी माझ्या खोलीत आहे आणी अगदी समाेर किचन रूम आहे... अगदी सहज पाहु शकतो पन पहायच धाडस होत नाही. काय कराव....?  किंचीतस डोकावुन पहातोच. म्हणजे अगदी पुढे न जाता भिंती आडुनच... काळीज धडघडतय , भिती वाटु लागलीये पन मला भास होतोय की खरच कोणी आहे हे पहायला हवच. भिंतीवर हात ठेऊन मी किंचीत आत डोकावतोय..
बाप रे...
कोणीतरी आहे...
हो.... आहे कोणीतरी.... 


पाठमोरी एक आकृती.. याचा अर्थ मला भास होत नाही आहे... मघापासुन जे घडतय जीी चाहुल जाणवतेय ती सत्य होती...  अंगातल्या पांढ-या गाऊनवर  ठिकठीकाणी रक्ताचे गडद्द डाग सुकून काळे पडलेत.  डावा हात दंडातुन तुटलाय... तर उजव्या हातात एक लांब धारधार सुरा आहे ज्या वर रक्त लागल्यासारखच दिसतय. एक दोन दा मानेला हिसडा देत त्या चाकाकणा-या स्टेनलेस स्टीलच्या चाकुवरुन नजर फिरवत तो मुठीच जरा गच्च पकडुन खाली झुकलीये... किचनच्या असलेल्या खिडकीतुन किंचीत प्रकाश येतोय. पन खाली जमिनीवरच काहीच दिसत नाही...
बाप रे. परवा तीने स्वता:चा हात तोडुन बाहेरच्या पिशाच्चांना खायला घातला होता... आता काय पाय तोडुन खायला घालणार की काय...?
हो... खरच ती काहीतरी कापतेय.. तीच्या घरच्यांना सांगायला हवय. पन बाहेर पडताना जर माझी चाहुल तीला लागली तर...?
नको मी इथच या अंधारात लपुन तीच्यावर लक्ष ठेवतो, कारण बाहेर धो धो पाऊस आणी सोसाट्याचा वारा सुटलाय. यात कोणाच दार वाजवल आणी त्यांनी नाही उघडल तर. आधीच त्या मांत्रीकान सांगितलय.
' ही पिशाच्च रात्री कोणाच्याही रुपात , कोणाच्याही आवाजात दारावर हाक देतील.. पन दरवाजा उघडु नका..'
आणी मी बाहेर धावताना जर हीन पाहील तर.
हा भला मोठा चाकु घेऊन मागे लागली तर... कल्पना करतोय, म्हणजे या धोधो कोसळणा-या पावसात, त्यात भयान काळोख मी जिवाच्या आकांतान पुढ धावतोय आणी ती हातात चाकु गच्च धरून माझ्या मागे धावतेय. तुटलेला हात किंचीत मागेपुढे हालतोय आणी केस पावसाच्या पाण्यान ओले होऊन तीच्या चेह-यावर पसरलेत... मी लोकांचे दरवाजे वाजवतोय कोणीच उघडत नाही.. आणी ओरडत किंचाळत ती अगदी जवळ आलीये, मी खड्ड्यात पाय घसरून पडलोय आणी... 


बाप रे..... पुढची कल्पनाच करवत नाही... बाहेर जायला नकोच...
पन समोरच दृष्यही पहावत नाहीत...
काय करू.. आता इथ खोलीत अंधाराचा फायदा घेऊन लपुनच तीच्यावर नजर ठेवायलाच हवी.  पन जर या काळोखात जर ती दिसेनाशी झाली तर..?
बाप रे.... विचारही सहन होत नाही...अंधारातचा फायदा घेऊन लपुनच रहातो..
ती अजुनही खाली वाकुन काही करतेय..
ती स्थिर झालीये...
  तीला चाहुल तर जाणवली नसेल...? माझी...?
कारण ती माझ्या दिशेने पहातेय.. अगदी शांतपने...
ती उभी राहतेय.... हातातला तो लांब धारधार सुरा अक्षरशा: रक्तान माखलाय... चेहरा केसांनी पुर्णपने झाकुन गेलाय.
पन तीच्या चेह-याच्या दिशेवरून तरी वाटतय की ती मलाच पहातेय....  हो अगदी तसच..  पन मी जीथ लपलोय तीथ किंचीतही प्रकाश येत नाही...
देवा आता काय करू..?
तीला कदाचीत माझी चाहुल जाणवलीेये... धावत बाहेर जाऊ...?
जीतक दुर जाता येईल तीतक दुर धावत जातो.. जोवर सकाळ होत नाही तोवर धावतो....
नाही.... तस नाही चालणार.... बाहेर ती 'भुतांची पालखी'.. आयता तावडीत सापडेन त्यांच्या.. मी आता जमिनीवर पडुन काळोखाचा आधार घेत भिंतीच्या आडुनच तीला पहातोय..  आता कसलाच आवाज न करता सरपटत सरपटत बेडच्या खाली जातो म्हणजे तीला नाही दिसणार.
सरपटताना  सरसर असा किंचीत आवाज होतोय . आणी ती पुन्हा शांतपने आपली मान किंचीत तिरकी करून ऐकतेय..
देवा ती इकड येऊ नये..
हात जोडतो.. 


आता कसलीच हलचाल नको करायला...
इथच पडुन रहातो... मग तीला कसलाच आवाज नाही जायचा... कशीतरी आजची ही रात्र काढायची आहे, तसेही आता 4 वाजायला आलेत... पहाट होईपर्यंन्त तरी मला असाच जीव मुठीत धरुन रहाव लागणार... पन तीच्यावर नजर ठेवायला हवी.
म्हणजे समोर दिसणा-या मरणापेक्षा अंधारात लपलेल मरण अधिक भितीदायक असत, म्हणुन तीच्यावर नजर ठेवायला हवी..
मानेला जोराचा हिसडा देत ती पुन्हा आपल्या कामाला लागलीये...
आई ग...! तीनं एक मांसाचा तुकडा काढुन ओट्यावर ठेवलाय... कदाचीत खाली वाकुन तेच कापत होती... देवा काय भयान दृष्य आहे..  डोळे बंद करून घ्यायला हवेत. पन नाही.. ती अंधारात नाहीशी झाली तर...? अंगातली सारी शक्ति एकवटुन जोरात ओरडावस वाटतय..
मग तरी कोणी मदतीला येईलच....
पन नाही आल तर हीला समजेल की मी या अंधारात लपलोय ते...
तिच्या समोर किचनच्या खिडकी बाहेर काही हलचाल दिसतेय... खिडकी बाहेर अशा या पावसात ती कोण लोक उभी आहेत..?
कोण माणसं असतील ....?
देवा... ही माणस नव्हेत... लांब हात आणी त्या रक्ताळलेल्या लांबसडक नख्या..
या भयान आकृत्या... जशी अनेक  पिशाच्च. काळोखात त्यांच्या सावल्या अधिकच भिषण दिसत आहेत. खिडकीतुन त्यांचे हात आत येताच तीन तो कापलेला मांसाचा तुकडा त्यांच्या दिशेन टाकला... आणी एका भरड्या आवाजात पुटपूटतेय...
तो अस्पष्ट आवाज...???


  "कुठवर  ** असे *** करून *** पोट भरू...?"
स्वप्नात ऐकलेला तेच अर्धवट वाक्य आता स्पष्ट ऐकु येत होत..
"कुठवर स्वता:च अस तुकडे करून तुमच पोट भरू..?"
तीचा तो भरडा किळसवाणा आवाज ऐकुन काळीज छाती फाडुन बाहेर येतो की काय अशी भीती वाटतेय... ती आणखी काही पुटपूटतेय... हो... आवाज येतोय...
" पन तुम्हाला उपाशी नाही ठेवणार..."
बडबडतच ती खाली वाकली हातातला तो स्टेनलेस स्टीलचा चकाकणारा धारधार चाकु खस्सकन मांसात खुपसल्याचा आवाज येतोय....
काहीतरी कापतेय.. मांस कापतानाचा चरचर चरचर असा तो आवाज या कोळोखातील भयान शांततेत आणखी भेसुर वाटतोय..
  खाली वाकुनच तीन हातातील चाकु किचनच्या ओट्यावर ठेवलाय. त्या चाकुवरून रक्ताचे थेंबन अजुन ओघळत आहेत.
तीचा तो तुटलेला हात काहीच कामाचा नाही.
ती उजव्या हाताने त्या आंधारात काही तोडतेय... झटका मारून ते उपसल आणी ती उभी राहीली,
तसा तीच्या उजव्या हातात दुसरा तुटलेला तो मानवी हात दिसला.... धडावेगळा केलेल्या त्या हातातील ते घड्याळ निसटुन ओट्यावर पडल.. ते घड्याळ जे आज येताना आईन माझ्या हातात घातलेल.. डोक सुन्न झालय... म्हणजे ते स्वप्न नव्हत... माझ्या उशाशेजारी बसुन तीन सुरवातीलाच माझा गळा चिरलाय आणी माझा आत्मा या अंधारात वावरतोय.. म्हणजे माझी 'अनोळखी चाहुल' तीला जाणवतेय....




समाप्त...

14 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. WoW Superb,
    He Story Vachtana Angala Shahare aalet. Khup Sundar lekhan aahe.
    Regards VIKRANT KRISHNARAO THAKRE

    ReplyDelete
  3. खूपच भयानक. हि कथा म्हणजे आत्तापर्यंत जश्या tv वर सिरीयल चालू होत्या आणि मग वेब सिरीज चालू झाल्या तशी आहे. बाकी सर्व कथा ह्या tv वरच्या मालिका आणि हि कथा म्हणजे वेब सिरीज. एकदम हटके. त्यात जोड म्हणून निवडलेली चित्र आणि GIF. खूपच भन्नाट. खूप छान लिहितोस. KEEP writing.

    ReplyDelete
  4. हि कथा फॉरवर्ड करु का...

    ReplyDelete